Tuesday, October 27, 2009

"निखळ मैत्री"

काल “Wake Up Sid” बघीतला. मध्यंतरापर्यंत नायकाची नायिकेबरोबर दाट मैत्री असते. अगदी घर share करुनही. नायक नेहमी प्रमाणे श्रीमंत घराण्यातला, बापाचा पैसा उडवणारा तर नायिका मुंबईत नवीन आलेली काहीतरी करुन दाखवण्यासाठी. त्याच्यापेक्षा वयाने थोडी मोठीच. ति ज्या दिवशी मुंबईत येते, त्याच दिवशी एका पार्टीत या दोघांची भेट होते आणि नंतर तो तिला मुंबईत जागा घेण्यापासुन ते तिचे घर लावण्यापर्यंत मदत करतो वैगेरे वैगेरे.

पुढे नेहमीप्रमाणे कथेत Twist हवा म्हणुन तो नापास होतो. आधी अत्यंत बेफिकीर असणारा, कुठलीही गोष्ट serious न घेणारा हा नायक ह्या घटनेने एकदम serious होतो. त्यात त्याचा बाप त्याला चार गोष्टी सुनावतो आणि सरळ "चालता हो" चा हुकूम देतो. आणि हा पण कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपली छाटी घेउन बाहेर पडतो.

च्यायला ! १२वीत मार्क कमी पडले तेव्हा आमच्या बापानेही आमची अशी वरात काढली होती, ४-५ दणकेही दिले आणि असाच हुकूम केला त्यावेळी रागाने आम्ही बाहेर पडुन ३-४ तास फ़क्त तलावपाळीला काढले. पण ज्यावेळी पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा गुमान खाली मान घालून घरी गेलो. बापानेही काहीही न बोलता आईला फक्त खूण करून जेवायला वाढायला सांगितल्याचे आजही मला आठवतेय. नंतर ज्यावेळी झोपलो त्यावेळी पांघरूण घालायला नेहमीप्रमाणे बाबाच आले आणि त्यावेळी डोक्यावरून हात फिरवताना त्यांचा हात त्यादिवशी थोडा अधिक स्नेहाद्र, प्रेमळ वाटला. असो हा आमुचा अनुभव.

तर कथेतला नायक रागाने घराबाहेर पडुन जो सुटतो तो सरळ नायिकेच्या घरी येउन टपकतो. ती ही आपल्या मैत्रीला जागुन वैगेरे त्याला आसरा देते, स्वत: एकटी रहात असुनही. (काश हमारी भी ऐसी कोइ एक दोस्त होती. पण हाय ! आमचे दुर्दैव ! आम्हाला तिच्यासारखी मैत्रीण नव्हती. आणि जी होती तीच्यासाठीच तर हे लिहितोय, असो). नायकाच्या घरात अत्यंत पसारा करुन ठेवण्याच्या सवयीशी सुद्धा जुळवून घेते, त्याच्या so called ढासळलेल्या आत्म-विश्वासाला पुन्हा उभारी देते, त्याला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरी मिळवून द्यायलाही मदत करते आणि मुख्यत्वे तोपर्यंत त्याचा इतर म्हणजे Mcdonalds , बाकीची बिले आणि इतर खर्चही करते. ( That’s Great ! ).

नंतर हा स्वत:च्या पायावर उभा रहातो, आपल्या बापाला आपल्या पगाराचा पहिला चेक नेवुन देतो. बापही नंतर पाघळतो आणि त्याला घरी घेउन जातो.इथपर्यंत ठीक. पण नंतर त्याला जाणवते कि आपले नयिकेवर प्रेम आहे. मग पुढे ओघाने आलेच कि त्या दोघानाही त्या प्रेमाची जाणीव होणे आणि नंतर त्यांच्या मिठ्या ,... इत्यादी. बस ! संपलं.

चित्रपट बघुन घरी आलो आणि रात्री झोपताना विचार करताना जाणवले कि खरच ह्या चित्रपटा मध्ये दिग्दर्शका ला नक्की काय दाखवायचय आहे हेच कळले नाही आहे. कारण सारांश काहीच उरत नाही. आणि असाच विचार करताना जाणवले कि खरच निखळ, स्वछ: मैत्री आजकाल मिळणे किती अवघड झाले आहे. आपल्या ह्या So Called समाजाला प्रत्येक नात्याला एक नाव हवे असते आणि त्यातही एक मुलगा आणि एक मुलगी ह्यांच्यामधल्या नात्याला तर आपण सगळे जण एकतर भाऊ-बहीण किंवा नवरा-बायको अशी नावे देतो. त्यातही एक मुलगा आणि एक मुलगी यांचे नाते जर का ह्या वरील गोष्टीना न्याय देउ शकत नसतील तर आपण बिनदिक्कत त्या नात्याला “लफडे / प्रकरण” हेच नाव देतो. निखळ, विशुध्द मैत्रीचे नाते आपल्या समाजाला अजिबात मान्य नसते. अगदी २०१० च्या ह्या काळातही.

आणि स्वत:ला प्रश्न पडतो कि खरच मैत्री इतकी दुर्लभ झाली आहे ?

तसाच मलाही पडला पण उत्तरही लगेच मिळाल. जाणवलं कि मला अशी एक मैत्रिण आहे जिच्या बरोबर गेली १२ वर्ष राहुनही आजही ति मैत्री अबाधीत आहे. आणि नशीबाने आजपर्यंत तशीच आहे.
आजही मला तो दिवस आठवतोय आपली पहिली भेट. १०वी नंतरच्या सुट्टीमध्ये ऎका Personality Devolopment Camp मध्ये आपली ओळख झाली. थोडिशी बावरलेली, गोंधळलेली तु आपल्या एका मैत्रीणीबरोबर आलेली आणि मी एका मित्राबरोबर. ओळख झाली आणि कळले कि आपण चारही जण एकाच विभागात रहातो. त्यावेळी खरं सांगू ! तुझ्याशी ओळख केलेली ती तुझ्या त्या मैत्रीणीसाठी. मला ती आवडलेली. च्यायला ! ते वयच विचीत्र असते नाही. प्रेम कशाशी खातात हे अजिबात माहीत नसते, आणि तरीही आपण प्रेमात पडत असतो. पण प्रत्येकाला / प्रत्येकीला वाटत असते कि आपणही कोणावर तरी प्रेम कराव, कोणीतरी आपलं असावे. तसंच काहीस माझं होतं आणि त्यावेळी मला एकाच ठिकाणाहुन अपेक्षा होत्या त्या तु मला मदत करशील म्हणुन.

पण नंतर आपण एकमेकाना भेटत गेलो आणि त्या Process मध्ये तुझी ती मैत्रीण कधी मागे पडली ते कळलच नाही. योगायोगाने आपली दोघांची Admission एकाच Collage मध्ये झाले आणि आपण भेटत गेलो. आपल्यात साहित्य हा एक विषय सोडला तर कोणतीही गोष्ट Common नव्हती. स्वच्छंद आणि निरंकूश आयुष्य जगणारा मी आणि बावरलेली, गोंधळलेली काकुबाईंच्या विचाराची तु. केवढा मोठा Mis Match होता आपल्यात. आणि तरीही आपली मैत्री गेली १३ वर्ष आहे. त्यावेळचे माझ्यासारखे माझे मित्र-मैत्रीणी आज कुठे आहेत हे ही माहीत नाही इतकी ती नाती कमकुवत होती आणि आपली मैत्री अजुनही आहे.

त्यानंतर आपण सतत भेटत गेलो. तुझा बुजरेपणा माझ्याबरोबर राहुन कमी झाला आणि माझा निष्काळजीपणा वाढत गेला. मी आणखीनच बेबंद झालो कारण मला माहीत होते कि माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायला तु होतीस. प्रत्येकवेळी माझ्यासाठी तु किती त्रास घ्यायचीस, माझी Attendance मि न सांगता लावयचीस, माझी Assignments पुर्ण करायचीस आणि अशा अनेक गोष्टी ज्याची गणतीच नाही. आज ज्यावेळी हे आठवते त्या वेळी तुझी उणीव प्रकर्षाने जाणवते. मला काय आवडते काय नाही, मला कोणते कपडे चांगले दिसतात, हेच काय तर मी कोणती Hair Style करायची हे सुद्धा तुच ठरवायचीस आणि मि हे आज मान्य करीन की तुझी माझ्याबाबतची निवड Perfect असायची. पण त्यामुळे मी माझ्याबाबत अधिकाधिक बेफ़िकीर बनत गेलो. कारण माझ्या प्रत्येक गोष्टीला तु असायचीस.

आणि आठवतंय आपण सगळेजण Marine Lines ला भर पावसात गेलेलो ते ! काय मजा आली होती त्यावेळी ! आपण अचानक सगळ्यानी ठरवलं आणि गेलो होतो. तिथे जाइपर्यंत अजिबात न पडणारा पाऊस तिथे धो धो कोसळायला लागला. त्या Marine Lines च्या धक्क्यावरून चालताना आपण पावसाने आणि समुद्राच्या लाटांच्या तुषारांमध्ये आपण सगळेजण ओलेचिंब भिजून गेलो होतो. त्यावेळी एकाच छत्रीतून आपण दोघानी जि पाऊस अनुभवला तसा त्यानंतर आजपर्यंत अनुभवता आलेला नाही.

त्यानंतर माझ्या आयुष्यात “ती” आली. प्रथमदर्शनीच ती मला खूप आवडली. मी तिच्याशी ओळख वाढवली आणी कळलं कि हिच ती जिच्या शोधात मी होतो. तिच्या-माझ्यातलं नातं हळूहळू आकार घेवू लागलं आणि मी तुमच्यापासुन दुर होत गेलो. त्यावेळी किती चिडलीस तु माझ्यावर ! तुझा त्यावेळचा तो Dialog आठवला कि आजही मला हसू फुटतं. तु म्हणालेलीस “ प्रेयसीसाठी मैत्री सोडणारा तु डुक्कर आहेस !”. काय सगळेजण हसले होते आणि मग मलाही तुझा राग आला आणि आपण भांडभांड भांडलो होतो. आपल्या मैत्रीतलं ते पहिलं भांडण.

पण नंतर उलटच झालं. ज्यावेळी “ती” तुला भेटली त्यावेळी तुमची अशी काही गट्टी झाली कि मी बाजुलाच पडलो. माझ्यापेक्षा तुच तिला जवळची झालीस. आमच्या एकांतातल्या भेटीतही तुझा विषय निघाला नाही असं कधी झालंच नाही. तुला काहीही बोललेलं तीला आणि तीला काहीही तुला अजिबात खपायचे नाही इतक्या तुम्ही दाट मैत्रीणी झाल्यात.

तीचं आणि माझं भेटायचं संकेतस्थळ तुझं घर होतं. आम्ही किती वेळा तुझ्यासमोर भांडलो, कितीवेळा आमच्या समस्या आम्ही तुझ्यासमोर मांडल्या आणि प्रत्येकवेळी तु किती संमजसपणे त्यावर उपाय काढलेस. तु नसतीस तर ? कायम आम्हा दोघानाही संभाळत तु ही तारेवरची कसरत कशी काय पार पाडलीस हे तुझं तुच जाणे !

यात आपली Collage ची ती सोनेरी वर्षं कधी सरली तेच कळले नाही. आम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला लागलो आणि तु आपले Post Graduation Join केलस. आपल्या भेटी कमी व्हायला लागल्या. आणि एक दिवस “ती” जशी अचानक माझ्या आयुष्यात आली होती तशीच अचानक निघून गेली. हा माझ्यासाथी खूप मोठा धक्का होता. तसा पहिल्यापासुनच मी हळवा ! त्यात हि घटना. अशावेळी तु माझ्यापाठी उभी होतीस. मला धीर देउन नवी उमेद तु दिलीस. माझा ढासळलेला आत्मविश्वास वर आणलास. त्यावेळच्या प्रत्येक क्षणात तू मला साथ दिलीस. तू जर का नसतीस तर एकतर मी वेडा झालो असतो किंवा ………….

कालचक्राने आपली चाल थांबवली नव्हती. या नंतरही २ वर्षं गेली आणि अचानक एक दिवस तु मला तुझं लग्न ठरल्याची बातमी दिलीस. खरं सांगू ! त्यावेळी मी कितीही वरुन आनंदीत झाल्याचं जरी दाखवलं असलं तरी आता माझी मैत्रीण माझ्यापासुन दूर जाणार ही कल्पनाच माझ्या पचनी पडत नव्हती. कारण मला तुझी इतकी सवय झाली होती कि, मी तुझ्याशिवाय अपूर्ण होतो. प्रत्येक वेळी माझ्यासाठी हजर असणारी, माझी काळजी घेणारी, प्रसंगी कानही पिळनारी तु माझी अत्यंत जिवलग मैत्रीण माझ्यापासुन अचानक अशी दूर कशी होवू शकते हेच मला सहन होत नव्हतं. मग मी तुला भेटणं कमी केलं, अगदी जाणुन – बुजून.

पण तुला ही गोष्टं न सांगताच कळली. त्यावेळी मला समजावत होतीस त्यावेळी मला तुझा खूप राग आला होता. पण मैत्रीचे खरे नाते त्यावेळी तु निभावलस. मला Collage च्या अल्लड जगातून वास्तवाच्या जगात आणलंस. तु सांगत होतीस “ हर्षल, असा कधीही कोणावरही विसंबून राहू नकोस. कोणीही आयुष्यात शेवटपर्यंत साथ देत नाही. प्रत्येकजण हा आयुष्यात नाटकातल्या Entry सारखा येतो. त्याची वेळ झाली, काम झालं कि तो Exit करतो. आता तो किती वेळ आयुष्यात रहातो ते त्याच्या त्याच्यावर असते. त्यामुळे आपण आपलं काम करावं. आणि मी लग्न करुन जातेय ! मी शब्द देते कि आपली मैत्री अखंड अशीच राहील.” आणि आजपर्यंत आपला शब्द तु पाळलास.

यानंतर आपण कधीही या विषयावर बोललो नाही पण आपल्यात एक अबोल दरी निर्माण झाली. यथावकाश तुझे लग्न झालं. मी लग्नाला जाणुन-बुजून आलो नाही. तु खूप रागावलीस. पण खरं सांगु ! कितीही तु समजावलंस तरी आता माझ्यामध्ये वाटेकरी येणार हे मला सहन झालं नव्हतं. पण झाल्या प्रकारामुळे तु दुखावली गेलीस. माझ्याशी अबोला धरलास.

अशीच आणखी २ वर्षं गेली. आपण या वेळेत कधीच एक्मेकांच्या समोर आलो नाही. मी तुझ्या घरी (माहेरी) यायचो पण आपण एकमेकांना टाळत होतो. आपली मैत्री माहीत असणारी तुझी आई ( काकू) पण मला म्हणाल्या “ कसले रे मेल्यानो भांडताय?” पण मी विषय टाळला.

आणि अचानक मी तुझ्या घरी असताना तु कोणतीही खबर न देता अचानक आलीस. आपण एकमेकाना बघीतलं आणि आपला निश्चय कुठ्च्या कुठे पळाला. आपण दोघेही एखादा बांध फुटून पाणी बाहेर पडावे तसे एकमेकांशी बोलायला लागलो. २ वर्षात दोघांच्याही आयुष्यात बरंच घडलं होतं. पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. आपण इतक्या वेळ बोलत होतो कि आपल्याला वेळेचं भानंच राहीलं नाहे. रात्रीचे ११ वाजले. पुर्ण १२ तास आपली अखंड बडबड चालू होती. शेवटी काकू (तुझी आई) म्हणाल्या कि “आता बस करा ! उद्यासाठी काही ठेवणार आहात कि नाही?” आणि नाईलाजाने आपण मग थांबलो आणि मी माझ्या घरी गेलो. पुढील २ दिवसात पहिल्या दिवसाचीच पुनरावृत्ती झाली. काकू म्हणाल्याही कि आपण बोलत बसलो कि आपण त्यांच्याशीही काही बोलत नाही. दोघच बोलत असतो.

तो दिवस आणि आजचा दिवस. आपली मैत्री जशी १३ वर्षापुर्वी होति तशीच अजुनही टवटवीत आहे. आजही आपल्यात तोच-तोचपणा येत नाही. आपल्याला आजही बोलताना विषय कमी पडतात. आपण एकमेकांना कंटाळत नाही. जणू काही आपली ओळख काल-परवाच झाली आहे असं वाटतं.

हे सगळं रामायण सांगायचा प्रपंच मी अशासाठी केला कि ज्या मैत्रीला खरच “निखळ मैत्री” म्हणता येईल अशी मैत्री जगात असु शकते आणि ती आपल्यात आहे हे सांगण्यासाठी. आपल्यात Movie मध्ये दाखवतात तसं कधीही प्रेम आडवं आलं नाही. मग भले काहीही होवो. आजही जर का मला तुझ्याबद्दल कोणि विचारलं तर आजही मी जे १२ / १३ वर्षपुर्वी सांगितलं होतं तेच सांगीन “ She Is My Best Friend & She Will Remain Forever, Nothing Else !”

बस ! खूप झाली तुझी स्तुती. आता थांबतो. नाहीतर शेफारून जाशील.

-हर्षल श. नेने

3 comments:

  1. सही. वेक अपपेक्षा छान स्टोरी आहे. मराठी चित्रपट काढता येईल इतकी.
    छान वाटलं वाचून.

    ReplyDelete
  2. हर्षल मुख्य म्हणजे तू एक चित्रपट पाहायचा त्रास वाचवलायस....:)
    आणि हो मैत्रीबद्द्ल म्हणशील तर मुला-मुलींच्या मैत्रीकडे आपल्याकडे निकोप दृष्टीने का पाहिले जात नाही माहित नाही. माझा मित्रही सुदैवाने अजुन बरोबर आहे पण कधीतरी मला वाटतं की जर आम्ही असं रात्रभर वगैरे एकत्र गप्पा मारायच्या ठरवल्या तर नवरा आणि त्याच्या कुटुंबियांच्या चेहर्याव्र नक्कीच आठ्या येतील...त्यामुळे एका विशिष्ट काळानंतर अशी नियंत्रित मैत्री ठेवावी लागते हे तसं दुर्दैवच आहे...असो....
    मी नेहमी विचार करते की कदाचित आपल्या पुढच्या पिढीसाठीतरी काळ खरंच बदलला असेल....

    ReplyDelete
  3. अप्रतिम..पण माझ्या बाबतीत ती आणि माझी बेस्ट फ्रेंड एकच आहे N वी विल बे बेस्ट फ्रेंड्स फॉरेवर :)

    ReplyDelete